राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; आ. सावे, बंब यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस

Foto

औरंगाबाद:  राज्य मंत्रीमंडळाचे वारे पुन्हा एकदा वाहु लागले आहे. गेल्या साडे चार वर्षात अनेकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होत होती पण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण विधानसभेच्या निवडणुका पाच महिन्यावर आल्या असल्याने रिक्त पाच जागा भरुन पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून केला जात आहे. या मंत्रीमंडळात जिल्ह्यातून भाजपाच्या आमदाराचा नंबर लागण्याची शक्यता आहे. 

विधानसभेच्या निवडणुका २०१४ मध्ये झाल्या. राज्यात भाजपा सेना युतीचे सरकार आले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मंत्रीमंडळात राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधीत्व देण्यात आले. पण मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. वास्तविक जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ जागांपैकी शिवसेनेने तीन आणि भाजपाचे तीन आमदार निवडून आले. असे असतांना जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. सध्या राज्य मंत्रिमंडळात पाच जागा रिक्त आहेत. त्या जागा येत्या एक दोन दिवसात भरल्या जाणार आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका पाच महिन्यावर आल्या आहेत. अशा स्थितीत पक्षाचा जनाधार वाढवा व पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी भाजपातर्फे जिल्ह्याला प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. अशी चर्चा आहे. जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी औरंगाबाद पूर्व मतदार संघातून आ. अतुल सावे तर  गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रशांत बंब हे मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहे.